कोल्हापूर : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकास प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वाची माहिती देताना शिवसेनेतील फुटीच्या राजकारणावरही भाष्य केले. “आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना,” असे विधान करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ‘शिंदे गट’ म्हणून संबोधले जात होते. मात्र आता तो कोणताही गट राहिलेला नसून तीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकच शिवसेना असून ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर त्यांनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याविषयी सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे जीर्णोद्धार आणि संवर्धन हे ऐतिहासिक काम आहे. शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराला नवसंजीवनी देण्याचे कार्य सुरू होत आहे,” असे शाह म्हणाले.
त्यांनी सांगितले की, सुमारे २८ हजार ५८ चौरस मीटर क्षेत्रात हा विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सातव्या शतकापासून इतिहासाची साक्ष देणाऱ्या या मंदिराचे मूळ वैभव जपून त्याचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. यामुळे देशभरातील आणि परदेशातील भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मंदिर परिसराच्या विकासासाठी पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधून परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे जतन आणि संवर्धन केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मंदिराचा ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवत आधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण मंदिर परिसरात अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच एलईडी प्रकाशयोजनेद्वारे मंदिर परिसर अधिक आकर्षक आणि सुरक्षित बनविण्यात येणार आहे. भाविकांसाठी सुयोग्य पायाभूत सुविधा, स्वच्छता, मार्गदर्शन व्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा प्रणाली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला राज्यातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महालक्ष्मी मंदिराच्या विकास प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



