जळगाव : प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे कुटुंबीय घराऐवजी गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केल्याची घटना तालुक्यातील करंज येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंज येथील रहिवासी सागर बाळू धनगर (वय २६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यामुळे ते कुटुंबीयांसह घराच्या गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाट आणि सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी रोख ३७ हजार रुपये तसेच सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल, १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके, १२ हजार रुपये किमतीचे मणी आणि सहा हजार रुपये किमतीची चांदीची चेन असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दि. ५ जून रोजी सकाळी कुटुंबीय खाली आल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेला आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी सागर धनगर यांनी १५ जून रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन चोरटे दुचाकीवर आल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण करीत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.



