जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधील लाखो रुपयांची चोरी होण्यापासून वाचली. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना वेळेवर माहिती मिळाल्याने आरोपींना घटनास्थळावरून पळ काढावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ३.४५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जारगाव गावातील सारोळा रोडवरील एसबीआय एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न सुरू होता. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड असलेले कॅबिनेट बाहेर काढले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, तीन संशयित तरुण एटीएममधील रोकड असलेले कॅबिनेट काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनात (क्रमांक एमएच ४९ सीएस ७०२८) चढविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहनात बसून तारखेडा दिशेने पळ काढला. त्यानंतर पाचोरा पोलिसांनी संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत करण्यात आला. तसेच संबंधित वाहनाबाबतची माहिती विविध टोल नाके, धुळे जिल्हा पोलीस तसेच मध्य प्रदेशातील नियंत्रण कक्षांना देण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित एटीएममध्ये तब्बल ८ लाख ८९ हजार ७०० रुपये इतकी रोकड होती. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे ही संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, एटीएम चोरीच्या प्रयत्नामागे आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



