जगळव : प्रतिनिधी
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेले संशयित चोरटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंगला शांताराम चौधरी (वय ७५, रा. आयोध्यानगर) या वृद्धेजवळ आले. त्यांनी वृद्धेला बोलण्यात गुंतवूण ठेवत त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीची तीन तोळे सोन्याची सोनपोत लांबवली. ही घटना दि. १४ जून रोजी आयोध्या नगरात घडली. या प्रकरणी सादीक शेख इबाबत शेख इराणी (वय २३, रा. पापा नगर, भुसावळ) व त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आयोध्या नगरमधील रहिवासी मंगला चौधरी या नेहमीप्रमाणे दि. १४ जून रोजी सकाळी मार्निंग वॉक करीत असताना समोरून एका दुचाकीवरुन दोन संशयित हे वृद्धेजवळ आले. त्यांच्यातील दुचाकी चालविणाऱ्याने वृद्ध महिलेला पत्ता विचारला. वृद्धा त्याला हाताच्या इशाराने संबंधित ठिकाण सांगत असतानाच दुचाकीवरील मागे बसलेल्याने वृद्धेच्या गळ्यातील एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोनपोत ओढली. त्यानंतर दोघेही दुचाकीस्वार भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याने भरधाव वेगाने निघून गेले. वृद्धेने आरडाओरड केल्यानंतर त्यांचा मुलगा व इतर नागरिक तेथे आले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून सादीक याच्यासह त्याच्या सोबत असलेला साथीदार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत.
सोनपोत चोरी झाल्यानंतर वृद्धा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना काही जणांचे फोटो दाखविले. त्यातील एका फोटोतील व्यक्तीला वृद्धेने ओळखले व तोच दुचाकी चालवत असल्याचे वृद्धेने पोलिसांना सांगितले. त्यावेळी सादीक शेख इबाबत शेख इराणी असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.



