यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीतील माथन या आदिवासी पाड्यावरील दांपत्याचा मद्याच्या नशेत बाजारातून घरी जाताना गाडऱ्या शिवारातील नदीच्या डोहात पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या कुशीत माथन हा आदिवासी पाडा आहे. या पाड्यावरील रहिवासी थावरा उर्फ भावऱ्या रजान पावरा (वय ५४) व त्यांची पत्नी धोंडीबाई थावरा उर्फ भावऱ्या पावरा (वय ३२) हे दांपत्य मंगळवारी बाजार करण्यासाठी गेले होते. दरम्यान, बाजार केल्यानंतर दोघेही मद्य प्राशन करुन घराकडे निघाले होते. मद्याच्या नशेत रात्री घरी जात असताना गाडऱ्या शिवारातील पाच्या पावरा यांच्या शेताजवळील नदीच्या डोहात रस्त्याचा अंदाज न आल्याने दोघे पाय घसरून डोहात बुडाले. तर, या दोघांचा मृतदेह बुधवारी तेथील नागरिकांना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात पो.ना. वसीम तडवी करत आहे. या दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.



