अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेर-धुळे महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या भीषण धडकेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ९ जून) सकाळी अमळनेर ते धुळे मार्गावरील मंगरूळ गावाजवळ हा अपघात घडला. अमळनेरहून धुळेमार्गे चाळीसगावकडे जाणारी एमएच १३ सीयू ७५४० क्रमांकाची एसटी बस, एमएच १८ सी ८७१९ क्रमांकाची दुचाकी आणि जीजे १९ एएफ ३१४७ क्रमांकाची कार यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार आणि दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठे प्रयत्न केले.
या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाचही जण गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी असून ते अमळनेरकडे येत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, रुग्णवाहिका आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने अमळनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार भरधाव वेग आणि वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



