

जळगाव : प्रतिनिधी
वरणगाव नजीक फुलगाव उड्डाणपुलाखालील बायपास रस्त्यावर रविवारी (दि. १) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका २८ वर्षीय युवकावर गावठी कद्वयातून गोळीबार करून लोखंडी रॉडने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात सरफराज सैय्यद बशीर सैय्यद (वय २८, रा. मुक्ताईनगर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर दुचाकीवरून आलेले तिन्ही अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असलम सैय्यद हा भुसावळ येथील बी. एन. अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला आहे. रविवारी काम आटोपून तो दुचाकीने मुक्ताईनगर येथील घरी जात होता. दरम्यान, त्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने उड्डाणपुलावरून न जाता पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्याला अडविले.
यावेळी हल्लेखोरांनी असलमच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केले. त्यानंतर गावठी कट्टूयातून त्याच्या पोटावर गोळी झाडली. अचानक झालेल्या या हल्ल्यात असलम गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. हल्ला केल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी असलमला नागरिकांच्या मदतीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल व पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फोन करून निर्जन रस्त्यावर बोलावून हा हल्ला करण्यात आला का, यासह हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. भरवस्तीजवळील बायपासवर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे वरणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



