२० हजारांची लाच घेताना PSI आणि खासगी पंटर रंगेहात जेरबंद
भुसावळ : एका गुन्ह्यात अटक न करता केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) आणि त्यांच्या खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे भुसावळसह संपूर्ण जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
राजू सांगळे असे अटक करण्यात आलेल्या PSIचे नाव असून, सलीम हकीम कुरेशी असे लाच स्वीकारणाऱ्या खासगी पंटरचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रकरणातील तक्रारदाराला संबंधित गुन्ह्यात अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी PSI राजू सांगळे यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. दरम्यान, PSI सांगळे यांनी त्यांचा खासगी पंटर सलीम कुरेशी याच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधून लाचेची रक्कम २० हजार रुपयांवर निश्चित केली.
ठरल्याप्रमाणे सलीम कुरेशी याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सलीम कुरेशी याने ही रक्कम PSI राजू सांगळे यांच्या सांगण्यावरून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत PSI सांगळे यांनाही अटक केली.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीच्या या धडक कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



