जळगाव : प्रतिनिधी
धानोरा येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकीचा अपघात होऊन अक्षय संजय देशमुख (२७, रा. कांचननगर) हे ठार झाले. तसेच त्यांचे मित्र गणेश सावळाराम पवार (४०, रा. रायपूर, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (१ मे) मध्यरात्री १२ वाजता कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉनजवळ झाला. दरम्यान, या प्रकरणात मयताच्या भावाने घातपाताचा संशय व्यक्त केला असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचननगरमधील रहिवासी अक्षय देशमुख व गणेश पवार हे दोघे धानोरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून ते दुचाकीने घरी परतत असताना मध्यरात्री १२ वाजता कानळदा रस्त्यावरील समर्थ लॉनसमोर खालीवर असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अक्षयच्या डोक्याला मार लागला होता. शासकीय रुग्णालयात अक्षय देशमुख यांना मयत घोषित केले. गणेश पवार हे जखमी झाले.
हा घातपात असल्याचा आरोप मयताचे भाऊ करण देशमुख यांनी केला आहे. मयताच्या शरीरावर शरीरावर इतर जखमा नसून दुचाकीचेही जास्त नुकसान नाही, त्यामुळे संशय अधिक वाढल्याचे मयताच्या भावाचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.



