जळगाव : प्रतिनिधी
रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनील सोसायटीमध्ये एका घरात साठवून ठेवलेला १ लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. ही कारवाई २० एप्रिल रोजी केली. याप्रकरणी घर मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इंद्रनील सोसायटीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा असून, तेथून त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी पद्मजा कढरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित घरावर छापा टाकला. पथकाने घराची तपासणी सुरू केली असता कोपऱ्यात लपवून ठेवलेला १ लाख ६६ हजार ७१९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. हा साठा कुठून आणला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याबाबत पथकाने विचारणा केली असता घरमालक सुरेश सुखदेव नरवाडे (५१) याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. गुटखा बंदी असतानाही त्याची साठवणूक केल्याबद्दल नरवाडे याच्यावर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



