एरंडोल : प्रतिनिधी
स्वतःच दुकानात गुटखा ठेवून अन्न व भेसळ विभागाच्या तोतया अधिकाऱ्याने चहा विक्रेत्याकडून दहा हजाराची खंडणी वसूल केल्याची घटना एरंडोलमध्ये घडली. याबाबत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल पाटील यांनी ठाण्यात मंगळवारी रात्री ९ वाजेपासून चार तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-जळगाव महामार्गावरील गजानन महाजन यांचे चहाचे दुकान आहे. या दुकानात सोमवार दि. २० रोजी दुपारी किशोर बाविस्कर व त्याचे चार साथीदार एका कारमधून आले. आपण अन्न व भेसळ खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्यासोबत असलेल्या एकाने स्वतःसोबत आणलेली गुटख्याची पिशवी दुकानात ठेवली आणि महाजन यांना धमकी दिली. तसेच गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी दहा हजाराची खंडणी घेतली. महाजन हे २१ रोजी तक्रार देण्यासाठी एरंडोल पोलिसात गेले असता तक्रार घेण्यास नकार देण्यात आला.
ही माहिती मिळताच आमदार अमोल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात पोहचले. व तिथे त्यांनी मोर ठिय्या मांडला. सामान्यांना न्याय मिळत नसेल तर शांत बसणार नाही,” असा आक्रमक पवित्रा आमदारांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. आमदार अमोल पाटील यांच्या ४ तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी किशोर बाविस्करसह पाच जणांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



