यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथून यावलकडे येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोर दुचाकीद्वारे यावलकडे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला क्रुझर वरील चालकाने भरधाव वेगात मागून धडक दिली. यामध्ये ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव (ता. यावल) येथून यावल येणाऱ्या रस्त्यावर हॉटेल मन मंदिराच्या समोरून दि. ९ रोजी रात्री भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हा यावल येथील पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोटरसायकल (एमएच. १९ सीजी २८१३) द्वारे यावल येथुन किनगाव मार्गे विदगाव जात होता. दरम्यान भरधाव वेगात मागून कुझर चारचाकी वाहन (एम. एच. २९ बी.सी. ५४८७) घेऊन चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा. आडगाव) हा येत होता. त्याने भरधाव वेगात मागून दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भरत कोळी हा पोलिस हवलदार जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला उपचाराकरिता जळगाव नेण्यात आले. तर अपघातप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीवरून क्रुझर वरील चालक दीपक सपकाळे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.



