जळगाव : प्रतिनिधी
शहरातील ‘इक्विटस स्मॉल फायनान्स बँक’चे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ३ एप्रिल रोजी, पोलन पेठ सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील इक्विटस बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चार चोरट्यांनी पळवून नेले होते. बँक व्यवस्थापक हरिश गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी त्यांच्या इतर ३ साथीदारांसह (फरहान, अकबर आणि मुजाहिद) मिळून ही चोरी केली होती. एटीएम पळवण्यासाठी शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक चारचाकी पिकअप गाडी चोरली होती आणि तिचा वापर गुन्ह्यात केला होता. त्यांनी भारतभर अनेक ठिकाणी एटीएमच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून पोलिसांनी मोटारसायकल, शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक मोबाइल फोन असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे व पथकाने केली. तपास सपोनि सुरेश आव्हाड करीत आहेत.



