जळगाव : प्रतिनिधी
मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विनोद अहिरे याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी विनोद अहिरे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्याला सापळा रचून रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारे लाच स्वीकारली आहे का, याचा तपास करण्यासाठी एसीबीकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने एक दिवसाचीच पोलिस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.



