धरणगाव : प्रतिनिधी
संशयावरून पतीने पत्नीच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिच्यावर भररस्त्यात चाकूने तब्बल १३ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी शहरातील बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्यानजीक घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बुधा लोंढे (४०, रा. संजय नगर, धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची पत्नी सोनल लोंढे (३३) ही धुणीभांडी करते. कामे आटोपून ती बुधवारी दुपारी घराकडे परतत होती. बालकवी ठोंबरे स्मारकाजवळील नाल्याजवळ दीपक याने सोनल हिला गाठले. काही समजण्याच्या आत त्याने तिच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. अचानक झालेल्या या प्रकाराने ती गोंधळली. त्याच वेळी पतीने तिचे हात, पाय, पोट आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले.
अतिरक्तस्रावामुळे सोनल जागीच कोसळली. नागरिकांनी तातडीने तिला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
याप्रकरणी सोनल लोंढे हिच्या फिर्यादीवरून पती दीपक लोंढे (वय ४०, रा. संजय नगर) याच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी धरणगाव पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



