जळगाव : प्रतिनिधी
प्रेमसंबंध असलेली महिला बोलत नसल्याच्या राग आल्याने संशयित गणेश छगन डोळे (रा. तानाजी मालुसरे नगर) याने महिलेवर लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद बायपास रोडवर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात ३९ वर्षीय महिला राहत असून तिचे गणेश डोळे याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. ती महिला गणेश डोळे सोबत बोलत नसल्याचा त्याला राग आला. त्यामळे डोळे याने नशिराबाद बायपासवरील रस्त्यावर महिलेसोबत वाद घालीत तीलामारहाण केली. मारहाणीनंतर त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी धारदार पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमी महिलेने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. ८ एप्रिल रोजी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गणेश छगन डोळे (रा. तानाजी मालुसरे नगर, जैनाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सफौ रघुनाथ पवार हे करीत आहे.



