जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवकॉलनी परिसरात विश्वासाला तडा देणारी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या महिलेनेच घरातील ९७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका संदीप पाटील (वय ३९, रा. शिवकॉलनी) यांनी त्यांच्या मावशीचे चुलत जावई हर्षल संजय वाघ यांच्यावर नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २०२२ मध्ये १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. नोकरी न लावल्याने त्यांनी वारंवार पैसे परत मागितले, मात्र त्यांना टाळाटाळीची उत्तरे मिळत होती. दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्या शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथे पैसे मागण्यासाठी गेल्या असता हर्षल वाघ घरी नव्हते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी संजय वाघ यांनी २ लाख रुपयांचा धनादेश दिला.
यानंतर ४ ते ६ एप्रिल दरम्यान हर्षल वाघ यांची पत्नी अश्वीनी हर्षल वाघ (रा. लोहगाव) या दीपिका पाटील यांच्या घरी पाहुणी म्हणून राहिल्या. ६ एप्रिल रोजी दीपिका पाटील या थेरेपीसाठी बाहेर गेल्या असताना अश्वीनी वाघ यांनी घरातील ५ ग्रॅमची सोन्याची पोत, ४ व २ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, चांदीची चेन व चांदीची अंगठी असे एकूण ९७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. संध्याकाळी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दीपिका पाटील यांनी ७ एप्रिल रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अश्वीनी वाघ हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करत असून, विश्वासाचा गैरफायदा घेत करण्यात आलेल्या या चोरीमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.



