जळगाव : प्रतिनिधी
नशिराबाद येथील रहमतपुरा भागातील साजिद खान सुलतान खान पठाण (वय २४) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना ७ एप्रिलला पहाटे घडली. या हल्ल्यात साजिद खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साजिद खान हा पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगावहून नशिराबादकडे येत असताना हॉटेल सावन समोर अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित राम संतोष मोरे (वय २४, रा. सत्यम पार्क, जळगाव) तसेच एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेला पूर्वीच्या वादाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. ६ एप्रिल रोजी साजिद खान व त्याच्या मित्रांनी राम मोरे याला नशिराबाद येथे आणून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याचाच राग मनात ठेवून राम मोरे याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून नशिराबाद पोलीस तपास करत आहेत.



