मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात एका निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून पाठवण्यात आलेल्या या पत्रात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पत्रात असा दावा आहे की, चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील एका महिला पदाधिकारीने अशोक खरातकडे महिलांना घेऊन जात होत्या. या पत्राच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या हेमा पिंपळे यांनी चाकणकर यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासण्याची मागणी केली असून पोलीस अधीक्षकांनी प्रकरण एसआयटीकडे सोपवावे, तसेच पत्रावरील स्वाक्षरीची तांत्रिक तपासणी करून संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू असून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार झाल्या आहेत. गर्भलिंग निदानासारख्या संवेदनशील विषयात त्यांचे नाव उघडकीस येत असल्याने त्यांच्या अडचणीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.



