भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीसह संशयित आरोपी अमोल किसनराव निंदाणे (वय २८) याला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले आणि पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवत मुलीचा ठावठिकाणा लावला व तिला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली. पीडित मुलीच्या जबाबानुसार आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानुसार संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील आणखी एका अशाच प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत शुभम अनिल पाटील (वय २१, रा. खिरोदा) याला अटक केली आहे. १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी त्याला मध्य प्रदेशातील भिकनगाव येथून ताब्यात घेण्यात आले. २८ मार्च रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. दोघांनाही रावेर येथे आणण्यात आले असून ४ एप्रिल रोजी आरोपीला अटक करण्यात आली. विशेष पोक्सो न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



