जळगाव : प्रतिनिधी
ट्रॅव्हल्सच्या ऑफिस समोर ठेवलेलया कुरीयर पार्सलमधून मोबाईल चोरुन नेणाऱ्या अल्पवयीन चोरट्याच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
शहरातील आकाशवाणी चौकातील श्री. स्वामी ट्रॅव्हल्सच्या ऑफिस समोरुन पाच मोबाईल असलेले कुरीयरचे बॉक्स चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ महेंद्र पाटील, नरेश सोनवणे, संतोष सोनवणे, तेजस मराठे, प्रवीण जाधव, प्रशांत लाड, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर ही चोरी अल्पवयीन मुलाने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या संशयित बालकाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरलेले ९६ हजार ९९६ रुपये किंमतीचे चार मोबाईल काढून दिले.



