नवी दिल्ली ; वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील रुदौली परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. विशेष म्हणजे, बुरखा घालून दरोडा टाकणारी तरुणी हिंदू असल्याचे समोर आले असून तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने ही संपूर्ण योजना आखली होती.
ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास कोठी बाजार मोहल्ल्यातील अग्रवाल कॉम्प्लेक्समधील ‘महेश ज्वेलर्स’ दुकानात घडली. आरोपी तरुणी पायल (वय 25) बुरखा परिधान करून दुकानात दाखल झाली होती. तिच्यासोबत पिट्ठू बॅग होती. तिने दुकानमालक महेश यांना सोन्याचा हार व चेन खरेदी करायची असल्याचे सांगितले.
दुकानदाराने तिच्यासमोर दागिने ठेवल्यानंतर तिने प्रथम पाणी मागितले. त्यानंतर तिने समोसा नाकारत मिठाई मागवण्यास सांगितले. या दरम्यान दुकानातील कर्मचारी बाहेर गेले असताना तिने संधी साधून हार आणि चेन उचलले. दुकानदाराने तिला अडवण्याचा प्रयत्न करताच तिने कमरेतून खेळण्यातील पिस्तूल काढून धमकावले — “पुढे आलात तर गोळी मारेन,” असा इशारा दिला.
यानंतर ती दुकानाबाहेर पळाली आणि काही अंतरावर बाईक घेऊन उभ्या असलेल्या तिच्या प्रियकर राहुल (वय 27) याच्यासोबत फरार झाली. दोघांनी मिळून अंदाजे 26 ग्रॅम (22 कॅरेट) वजनाचे सुमारे 3.6 लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण घटना कैद झाली होती. तसेच आरोपींनी वापरलेल्या बाईकचा नंबरही स्पष्टपणे दिसत होता. याच धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुरुवारी रात्री उशिरा दोघांनाही अटक केली.
प्राथमिक चौकशीत राहुलनेच बाजारातून बुरखा आणि बनावट पिस्तूल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. ओळख लपवण्यासाठी पायलने बुरखा परिधान केला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत असून, या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जात आहे.



