जळगाव : प्रतिनिधी
समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने दिलेल्या जोरदार धडकेनंतर रस्त्यावर कोसळलेल्या दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडीगावाजवळील महामार्गावर घडली. बुधवारी (दि. १ एप्रिल) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव समाधान बापू भोई (वय ३२, रा. भालगाव, ता. एरंडोल) असे आहे. समाधान भोई हे फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी ते भुसावळ येथून दुचाकीने आपल्या गावी परतत होते. दरम्यान, खेडीगावाजवळील महामार्गावर समोरून येणाऱ्या मालवाहू रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना पुन्हा धडक दिल्याने अपघात अधिक भीषण बनला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोहेकॉ नरेंद्र मोरे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या भोई यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर धडक देणारे वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. समाधान भोई यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले व भाऊ असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



