जळगाव : प्रतिनिधी
कार खरेदीनंतर ‘कॉम्प्लिमेंटरी टुर पॅकेज’ जिंकल्याचे आमिष दाखवून आर्थिक सल्लागाराची तब्बल १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ ते १८ एप्रिल २०२५ दरम्यान घडली असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गौतमराव साळुंखे (वय ४७, रा. रणछोडदास नगर, सिंधी कॉलनी रोड) हे ‘राजलक्ष्मी फिनसॉल्व्ह’ या नावाने विमा एजन्सी चालवितात तसेच आर्थिक सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी अलीकडेच कार खरेदी केली होती. त्यानंतर १७ एप्रिल २०२५ रोजी ‘विन्स सिग्नेचर क्लब प्रा. लि. (ओपीसी)’ या कंपनीकडून त्यांना कॉल आला. कार खरेदीच्या निमित्ताने ‘कॉम्प्लिमेंटरी टुर पॅकेज’ मिळाल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या दिवशी भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले.
१८ एप्रिल रोजी साळुंखे हॉटेलमध्ये गेले असता त्यांना आकर्षक टुर पॅकेजची माहिती देण्यात आली. त्यास भुलून त्यांनी ते पॅकेज स्वीकारले आणि त्यासाठी १ लाख ४० हजार रुपये नेट बँकिंगद्वारे कंपनीकडे जमा केले.
यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी कुटुंबीयांसह फिरण्यासाठी जाण्याचे त्यांनी नियोजन केले. मात्र कंपनीच्या कस्टमर केअरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पुढे कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
दरम्यान, साळुंखे यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी टूर रद्द करण्याची विनंती केली, परंतु कंपनीने त्यास नकार दिला. काही दिवसांनी पुन्हा प्रवासाचे नियोजन करताच त्यांना गोव्याच्या प्रवासासाठी रेल्वेचे वेटिंग तिकीट देण्यात आले. हॉटेल बुकिंगबाबत विचारणा केली असता ‘गोव्याला पोहोचल्यानंतर माहिती देऊ’ असे सांगण्यात आले. मात्र संशय वाढल्याने त्यांनी आगाऊ बुकिंगची माहिती मागितली, तीही देण्यात आली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी ३१ मार्च रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.



