जळगाव : प्रतिनिधी
घराला कुलूप लावून ड्युटीवर गेलेल्या तृषा चंद्रकांत संन्याशी (वय ३९, रा. कोल्हे हिल्स परिसर) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख २० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २८ मार्च रोजी भरदिवसा कोल्हे हिल्स परिसरात घडली. दरम्यान, चोरटे कडीकोयंडा तोडत असताना त्यांना दरवाजाच्या बाजूलाच चावी ठेवलेली दिसली व त्यांनी कुलूप उघडून ही चोरी केली.
तृषा संन्याशी या रुस्तमजी स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून शाळेत गेल्या. त्यानंतर १० ते दुपार दुपारी एक वाजेदरम्यान चोरटे शिक्षिका राहत असलेल्या शकुंतला हाईट्स या अपार्टमेंटमध्ये शिरले. घराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न करताना त्यांना दरवाजाच्या बाजूला चावी दिसली. त्या चावीद्वारे त्यांनी कुलूप उघडून घरातून रोख २० हजार रुपयांसह एक तोळा सोन्याची चेन, दीड तोळा, अडीच ग्रॅम व दोन ग्रॅम असे सोन्याचे तीन मंगळसूत्र, चार ग्रॅमचे रिंग, चार ग्रॅमचे सोन्याचे शिक्के, एक ग्रॅम सोन्याचा तुकडा असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. शिक्षिका घरी आल्या त्यावेळी ही घटना समोर आली.
घरफोडी झाली त्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावण्यासह वॉचमनचीही नियुक्ती केलेली आहे. चोरी झाली त्यावेळी वॉचमन बाहेर गेलेला होता. तसेच त्याचवेळी वीजपुरवठा खंडित झालेला असल्याने चोरटे सीसीटीव्हीतही कैद झालेले नाहीत. याविषयी शिक्षिकेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.
भरदिवसा दुपारच्या वेळी एवढी मोठी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा चोरटे आता धाडस करू लागल्याने पोलिसांचा धाक आहे की नाही, असाही सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.



