मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील भोंदू अशोक खरातसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या पार्श्वभूमीवर विधिज्ञ वकील असिम सरोदे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.
सरोदे यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? तुम्ही अंधश्रद्धा बाळगणारे आहात, तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन पाळावा ही घटनात्मक जबाबदारी न पाळणारे आहात. खरातसोबत तुमचे विशेष फोटो असल्याने तुम्ही दोषी आहात.” त्यांनी असा दावा करत मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, फक्त अशोक खरातसोबत फोटो असल्यामुळे कोणावरही कारवाई होणार नाही. तसेच, या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
सरोदे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “अशोक खरात यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते म्हणून होती का? अशोक खरात शास्त्रज्ञ आहेत का? 2004 पासून खरात अंकशास्त्र, ज्योतिष्य या गोष्टी करत वाढला आहे. कुणी सहज एखाद्या कार्यक्रमात भेटला आणि फोटो काढला ती वेगळी गोष्ट, पण तुम्ही त्याला विशेष भेट देणे किंवा मिटिंग ठेवणे आणि आता ‘फक्त फोटो आहेत, त्यामुळे दोषी नाही’ असे सांगणे आश्चर्यकारक आहे.”
सरोदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय व कायदेशीर चर्चेला तज्ज्ञांचा आणि जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घटनात्मक जबाबदारी, अंधश्रद्धा आणि शास्त्रीय दृष्टिकोन या मुद्द्यांवर सध्या बहुसंख्य माध्यमे लक्ष केंद्रीत करत आहेत.



