पुणे : वृत्तसंस्था
नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील या पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला तिने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी पुण्यातील हडपसर भागातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याचा दावा करत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. एका 35 वर्षीय पीडित महिलेने या भोंदू बाबा विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्याने ‘मी तुझा शंकर, तू माझी पार्वती’ म्हणत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तिची समाज माध्यमातून वसई येथील ऋषीकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. पीडित महिला व्रतवैकल्ये करत असल्याने, वैद्यने तिला आपल्या जाळ्यात ओढले. ‘माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र मी तुला शिकवतो,’ असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर, 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला. त्याने मांजरी परिसरात पीडित महिलेची भेट घेतली. तिथे त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला पुन्हा वसई येथे बोलावून तिथेही तिच्यावर अत्याचार केल्याचे महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे.



