जळगाव : प्रतिनिधी
मनपाच्या स्वीकृत सदस्यपदासाठी दाखल अर्जाची २७मार्च रोजी छाननी झाली. त्यात भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे व रमेश मतानी यांचे अर्ज वैध ठरले असून राहूल वाघ व सुभाष शौचे यांच्या अर्जात तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. त्रुटी दूर करण्यासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात आली. त्यांच्यातही शौचे यांचाच अर्ज वैध ठरु शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगरसचिव सतीश शुक्ला यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी दाखल झालेल्या अर्जाची दि.२७ मार्च रोजी छाननी केली. ज्यांचे अर्ज वैध झाले त्यांची निवड निश्चित मानली जात असून आता फक्त महासभेत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. उध्दव सेनेत गटनेतेपदावरून दोन गट आमनेसामने आले होते. यात इब्राहिम पटेल यांनी भाजप समर्थक युगंधरा सोळुंके यांचे नाव पुढे केले आहे तर पक्षाने पटेल यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करत अर्शिन बानो खाटिक यांची गट नेतेपदी नियुक्ती केली आहे. यानुसार त्यांनी महानगरप्रमुख शरद तायडे यांचे नाव सुचविले आहे. तायडे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
आता तायडे यांच्या अर्जाची छाननी सोमवारी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.



