जळगाव : प्रतिनिधी
शहरातील जैनाबाद परिसरात केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद) यांचा सोमवारी (दि. २३) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शनिपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जैनाबाद परिसरात नितीन काळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. आई-वडील, पत्नी, एक मुलगा तसेच भाऊ-बहीण असा त्यांचा परिवार आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना गोवा येथे कटलरी दुकानात नोकरी मिळाली होती. तेथे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, सुट्टीसाठी ते चार दिवसांपूर्वी जळगावात आले होते. रविवारी (दि. २२) दुपारी सुमारे ३ वाजता जैनाबाद परिसरातून जात असताना संशयित आरोपीने नितीन काळे यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने त्यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनामुळे जळगाव शहर पुन्हा एकदा हादरले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



