अमळनेर : प्रतिनिधी
कॉपी पुरवण्यास नकार दिल्याने दोघांनी एका होमगार्डला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केल्याची घटना १४ रोजी रात्री ८.३० वाजता भारत गॅस गोदामाजवळ घडली होती. या प्रकरणी उशिरा ८. गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डी. डी. नगरमधील भूषण पाटील याचा भाऊ पीयूष पाटील याची एन. टी. मुंदडा माध्यमिक विद्यालयात परीक्षा सुरू होती. त्याला कॉपी पुरवण्यासाठी भूषण याला शाळेत जायला मदत कर, असे अनिकेत राजेंद्र पाटील (रा डीडी नगर) याने होमगार्ड राकेश पुरुषोत्तम चौधरी यांना सांगितले. मात्र, होमगार्ड चौधरी यांनी नकार दिल्याने अनिकेतने त्यांना शिवीगाळ करत खाली पाडले. तसेच भूषणने पकडून ठेवले.
अनिकेतने लाथाबुक्क्यांनी होमगार्ड चौधरी यांना मारहाण करून लोखंडी रॉड डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, होमगार्ड चौधरी यांनी वार चुकवल्याने तो मार त्यांच्या चेहऱ्यावर लागला. याबाबत उशिराने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अनिकेत व भूषण विरुद्ध विविध कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. संदेश पाटील करत आहेत.



