जळगाव : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकातील मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरड मंडळाचे अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येडे आणि त्यांचे पथक पिंपरखेड गावाजवळ अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालत होते. या वेळी त्यांना वाळूने भरलेले एक निळ्या रंगाचे स्वराज ट्रॅक्टर (एमएच- २०, जीक्यू- १६८०) दिसले. पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ते वेगाने पळवून नेले. काही अंतरावर ट्रॅक्टर अडवल्यावर त्यात सुमारे सव्वा ब्रास वाळू असल्याचे आढळले. ट्रॅक्टर थांबवल्यानंतर काही वेळातच संशयित योगेश गंजे, तेजस पाटील आणि हेमंत शिंदे हे स्विफ्ट डिझायर गाडी एमएच ०३, बीई ५४३७) तून घटनास्थळी आले.
त्यांनी पथकाशी वाद घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यानंतर संजय त्रिभुवन आणि योगेश गंजे यांनी मंडळ अधिकारी दिनेश येडे यांना गाडीवरून खाली ओढून मारहाण केली. संजय त्रिभुवन याने हातातील लोखंडी वस्तूने येडे यांच्या गालावर प्रहार केला, ज्यामुळे ते जखमी झाले. यानंतर संशयितांनी पथकातील इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आणि चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. या घटनेनंतर जखमी मंडळ अधिकारी व पथकाने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांत धाव घेतली. दिनेश येडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय त्रिभुवन (रा. वाक, ता. भडगाव), योगेश सुरेश गंजे, तेजस रवींद्र पाटील आणि हेमंत शिंदे (सर्व रा. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.नि. महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



