जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या रोहित समाधान पवार (वय १८, रा. निभोरा, ता. धरणगाव) या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास वस्तीगृहातच हॅलो मित्रांनो मी आयडी बंद करतो आहे, कारण तीला प्रॉब्लम येत आहे, असे इन्टाग्रामवर स्टोरी ठेवत गळफास घेत आत्म्हत्या केली. आत्महत्येच्या काही तासांपुर्वीच रोहीतचे वडील व काका त्याल भेटून गेले आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे राहणारा रोहित पवार हा जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये मशिनीस्ट ट्रेंडच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मंगळवार दि. १७ रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटायला वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही,’ असे त्याने वडिलांना सांगितले होते. वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच रोहितने वस्तीगृहातील आपल्या खोली मफलरच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतला. त्याने दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला संशय आल्याने त्याने वसतिगृहातील कर्मचारी रणजित सावळे यांना बोलावले. दरवाजाला जोरात धक्का देऊन तो उघडला असता रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रोहीतला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत रोहीतला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हाय मित्रांनो… माझी आयडी बंद करतो आहे कारण तीला प्रॉब्लम येत आहे, तरी कोणी ही मॅसेज करु नका कोणाला काही वाईट मॅसेज आले तर मला माफ करा. गुड बाय इन्सटाग्राम फॅमिली असा मजकुर आणि स्वतःचा फोटो स्टोरी म्हणून ठेवला होता. या संदेशामुळे रोहित काही मानसिक तणावाखाली होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रोहितच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ‘वसतिगृहात त्याला काहीतरी त्रास होत असावा, त्यातूनच त्याने हा निर्णय घेतला,’ असा गंभीर आरोप रोहितचे वडील समाधान पवार यांनी केला आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक अनिल अडकमोल, शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.



