पाचोरा : प्रतिनिधी
पाच हजारांच्या स्टॅम्प घेण्यासाठी अतिरीक्त पाचशे रुपयांची लाच घेतांना स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९) व झेरॉक्स दुकानदार प्रशांत ईश्वरलाल संघवी (दोघ रा. विवेकानंद नगरी, पाचोरा) यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दि. १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दि. १५ रोजी पाचोरा शहरातील भडगारस्त्यावर असलेल्या प्रशांत झेरॉक्स दुकानात पाचशे रुपयांचे दहा स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. त्यांना स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी एका स्टॅम्पची किंमत ५५० रुपये सांगितली. तसेच तक्रारदार यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना आधारकार्ड घेवून या तेव्हाच तुम्हाला स्टॅम्प मिळतील असे सांगितले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
मंगळवारी तक्रारदार हे वेंडर संघवी यांच्याकडे स्टॅम्प घेण्यासाठी गेले. स्टॅम्प वेंडर यांनी पाच हजारांच्या स्टॅम्पचे साडेपाच हजार रुपये घेवून पाचशे रुपयांची लाच स्विकारली. इशारा मिळताच सापळा रचून बसलेल्या पथकाने पाच स्विकारतांना स्टॅम्प वेंडर योगेश संघवी व झेरॉक्स दुकानदार प्रशांत संघवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे या करीत आहे.



