भुसावळ : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे १४ मार्च २०२६ रोजी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेल्या शादाब रईस कुरेशी (वय ३५) या सराईत गुन्हेगाराला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून अटक केली. तपासात पोलिसांना कुरेशीकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीन जप्त झाले असून, तो भुसावळात मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. याच दरम्यान, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली की, बस स्थानकाजवळील रिक्षा स्टॉप परिसरात शस्त्रासह एक संशयित व्यक्ती थांबली आहे.
माहितीची खात्री करून पोलिसांनी तातडीने परिसराला वेढा घातला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुरेशीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून गावठी कट्टा सापडला. चौकशीत कुरेशी भोपाळ पोलिसांच्या नोंदीतील ‘हिस्ट्रीशिटर’ असल्याचे उघड झाले. त्याने १४ मार्च रोजी अशोका गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीवर गोळीबार केला होता आणि तेव्हापासून फरार होता. भुसावळ पोलीसांनी अटकेची माहिती भोपाळ पोलिसांना दिली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भारती काळे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करत आहेत.



