अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या गव्हाच्या शेताला शॉर्ट सर्किटने आग लागून गहू अन् ठिबक नळ्या आदी जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात रोहित्र असून या रोहित्रात पक्षी शिरल्याने शॉर्टसर्किट झाले अन् त्याची ठिणगी उभ्या गव्हाच्या पिकावर पडल्याने आग लागली. काही वेळातच संपूर्ण शेतात आग पसरली. तर, अग्निशमन दलाला बोलावण्यासाठी ग्रामस्थांनी पालिकेला कळवले. परंतु, पालिकेने आधी पोलिसांत तक्रार करा, असे सांगितले. तोपर्यंत शेतात आग वाढत गेली.
दरम्यान, गावातील श्याम पाटील, भीमराव पाटील सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह गावातील शेतकरी व तरुणांनी आजूबाजूच्या शेतातल्या ओल्या मक्याची व बाजरीची तोटे घेऊन आग विझवणे सुरू केले. बऱ्याच वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. तोपर्यंत दिनेश पाटील यांनी पो.नि. दत्तात्रय निकम यांना ही कळवल्यानंतर अग्निशमन बंब उशिरापर्यंत पोहोचला. मात्र, शेतातले तापमान आणि ठिणग्या शिल्लक राहू नयेत, म्हणून अग्निशमन दलाने पाणी मारून शेत ओले केले, त्यामुळे धोका टळला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास हे. कॉ. काशिनाथ पाटील करत आहेत.



