यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील वढोदा या गावाजवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीचे अँगल तुटल्यामुळे ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये एक वृद्ध ठार झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी घडला असून मृत व जखमी सर्व उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार आहेत. तर या अपघात प्रकरणी उशिरापर्यंत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वढोदा ता. यावल या गावाजवळून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो. या राज्य मार्गावरून शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील बोरवेल कामगार एका ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून यावलकडे येत होते. दरम्यान अचानक धावत्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले आणि अपघात घडला. यात ट्रॉली रस्त्याच्याकडेला कलंडली या अपघातामध्ये मुन्नू सिंह चौहान (वय ६२) हे वृद्ध ठार झाले. या अपघातात मुकेश सिंग (वय ४५), केशव सुरेश चव्हाण (वय २०) व सुमित कुमार (वय २१ सर्व राहणार उत्तर प्रदेश) हे जखमी झाले. जखमींना तातळीने यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले येथे डॉ. तुषार सोनवणे, डॉ. रोहित कोळी, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, जॉन्सन सोरटे यांनी प्रथमउपचार केले व त्यांना पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



