जळगाव : प्रतिनिधी
पोलिस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील अपहार प्रकरणात पसार असलेले पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ हे अखेर पोलिसांना शरण आले. सोमवारी (९ मार्च) त्यांना व त्यांचा मुलगा शेखर वाघ याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी व्यवस्थापक म्हणून वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांच्या बँक खात्याची चौकशी केली. यामध्ये अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाल्मीक वाघ हे पसार असल्याने त्यांच्या शोधार्थ वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. ९ मार्च रोजी ते स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी चौकशी केली. चौकशीत वाघ हे इतक्या मोठ्या रकमेचा नव्हे तर केवळ दहा ते पंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याचे सांगत आहे. पोलिसांकडून देखील वाघ यांनी इतकी मोठी रकमेची विल्हेवाट कशी लावली, अपहाराची रक्कम कशा पद्धतीने हस्तगत करता येऊ शकते याबाबत चौकशी केली जात आहे.



