भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस परिसरातील कवाडेनगर येथे २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ९) सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विजेश अण्णा शिंदे (२२) असे असून तो कुटुंबासह कवाडेनगर येथे राहत होता. सोमवारी सकाळी कुटुंबीय त्याला बोलवण्यासाठी खोलीत गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात बबलू नेटेकर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे हलविण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास हवालदार गजानन पाटील करीत आहेत



