धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवारी (९ मार्च) सायंकाळी सुमारे ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण प्रल्हाद विसपुते (वय ४५) या आपल्या कुटुंबासह ७ मार्च रोजी नाशिक येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ७ मार्च रोजी रात्री ११ ते ८ मार्च रोजी सकाळी ७.३० या दरम्यान कृष्ण गीता नगर येथील त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ७ ग्रॅमची सोन्याची माळ, १० ग्रॅमची सोन्याची चैन, ३० ग्रॅमचा सोन्याचा राणीहार, १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, सोन्याचे झुमके तसेच सोन्याची ठुशी यांचा समावेश आहे. याशिवाय कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली.
दरम्यान, ८ मार्च रोजी सकाळी विसपुते कुटुंब नाशिकहून घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले, त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



