जळगाव : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल आणून त्याची विक्री करणाऱ्या सातजणांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत एक गावठी कट्टा हस्तगत केला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले
केशव भालेराव याला खाक्या दाखविताच त्याने दोन कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यापैकी एक कट्टा यशला आणि दुसरा कट्टा गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गौरव यालादेखील अटक करून त्याच्याकडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी (एमएच १९, सीएम १३१२) हस्तगत केली. समाधान निकम याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. तर केशव हादेखील एका गुन्ह्यात पोलिसांना सापडत नव्हता. त्याचप्रमाणे गौरव साळवे हा पिंप्राळा येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा मित्र आहे.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समाधान निकम याला नेरी (ता. जामनेर) येथून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने मध्य प्रदेशातून गावठी कट्टे आणून विकत असल्याची कबुली दिली. यात केशव भालेराव, विकास प्रकाश काकडे (२८, रा. साळसिंगी ता, बोदवड), यश नन्नवरे, गौरव साळवे, जगदीश गजानन महाजन (२०, शहापूर, जि. बुन्हाणपूर, मध्य प्रदेश), कैलास राजेंद्र माळी (२२, रा. बोरकुंड, ता. जि. धुळे) यांच्याकडून ८ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली.



