भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील यशोधन पार्क परिसरात झालेल्या किरकोळ वादातून सिमेंटची कुंडी डोक्यात घालून एकाचा निघृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. घटनेनंतर आरोपी स्वतः भुसावळ बाजारपेठ पोलिसात हजर झाला. अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (४७, गोविंद कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) असे मृताचे तर रोहित पुरुषोत्तम भावसार (नेब कॉलनी, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान अनिल सावकारे हे यशोधन पार्कजवळील एका सलून दुकानासमोर काही मित्रांसोबत दारू पित बसले होते. त्यावेळी रोहित भावसार तेथे आला. दरम्यान, वेळ विचारण्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन झटापट झाली. यात अनिल सावकारे हे दारूच्या नशेत खाली पडल्यावर आरोपीने जवळच असलेली सिमेंटची कुंडी उचलून डोक्यावर दोन ते तीन वेळा जबर प्रहार केले. यात अनिल यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास आरोपी रोहित हा स्वतःहून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात हजर झाला. अनिल याचे भाऊ भागवत सावकारे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन रोहित याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



