मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावर संदेश प्रसिद्ध करत त्यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. केवळ आर्थिक तरतुदींवर चर्चा न होता राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा करत खडसे यांनी या विषयावर गांभीर्याने चर्चा व्हावी आणि प्रभावी उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी केली. तसेच भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, असेही त्यांनी नमूद केले.भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारांमुळे कोसळणारे पूल, खचणारे रस्ते यावर कठोर कारवाई व्हावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले. बंद पडणाऱ्या मराठी शाळा, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि राज्याबाहेर स्थलांतरित होणारे उद्योगधंदे या मुद्द्यांवर उत्तरदायित्व निश्चित व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूचे गूढ उलगडणे, असे खडसे यांनी स्पष्ट केले. “आमचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूमागचे सत्य जनतेसमोर यावे. चौकशी प्रक्रियेत गती न दिसल्यास आमदार रोहित पवार यांच्यासह पक्ष सातत्याने पाठपुरावा करेल,” असे त्यांनी नमूद केले. मात्र ही केवळ एका पक्षाची भूमिका नसून सर्व पक्षीय आमदारांनी सभागृहात सरकारला जाब विचारावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
२८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळून मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला असला, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे चौकशीची गती आणि पारदर्शकता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



