भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादातून चाकूहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलगा आणि एक तरुण गंभीर जखमी झाले असून, मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रजा टॉवर चौकात एका १३ वर्षीय मुलगा आणि एका तरुणामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वादाने अचानक उग्र रूप धारण केले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी अज्ञात व्यक्तीने संतापाच्या भरात तेरा वर्षीय मुलाच्या डाव्या कानाजवळ चाकूने जोरदार वार केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या आणखी एका तरुणालाही लक्ष्य करण्यात आले. त्याच्या डाव्या मांडीवर चाकूने वार करण्यात आल्याने तोही गंभीर जखमी झाला. भरदिवसा आणि गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत दोन्ही जखमींना तातडीने भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दुसऱ्या जखमी तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. जखमी उपचाराधीन असल्यामुळे त्यांचे जबाब नोंदविणे शक्य झाले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. जखमींची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचे जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा गजबजलेल्या चौकात घडलेल्या या चाकूहल्ल्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



