जळगाव : प्रतिनिधी
ऑनलाइन पार्टटाइम कामाच्या आणि ‘मर्चट टास्क’ पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पाचोरा येथील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल ८ लाख ५० हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील रहिवासी कीर्ती दिलीप येवले (वय ३२) या खासगी नोकरी करतात. ८ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान, ‘अरोकीया जेनीता’ नावाच्या एका महिलेने, जी स्वतःला एनएसई च्या प्रशासक विभागात कार्यरत असल्याचे सांगत होती, तिने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कीर्ती यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर टेलिग्रामवरील ‘ऐंजलिया’ नावाच्या अॅडव्हायजरने त्यांना एनएसई मर्चट टास्क’ पूर्ण केल्यास मोठ्या फायद्याचे आमिष दाखवले. आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा सामना करावा लागला आहे.
सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यानंतर कीर्ती यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक नफ्याच्या हव्यासापोटी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. ८ ते १२ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत तक्रारदार महिलेकडून एकूण ८ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन भरून घेतले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कीर्ती येवले यांच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



