जळगाव : प्रतिनिधी
लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिलेचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील बारी वाडा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या १० फेब्रुवारी रोजी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या बसने पाळधी (पहूर) येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान चोरट्यांनी सुनीता बारी यांच्याजवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापली. पिशवीत ठेवलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (पेंडंटसह) आणि ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, असा एकूण ३८ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सुनीता बारी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भटू पाटील हे करत आहेत.



