जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर–जामनेर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी व अवजड वाहनातील धडकेत जामनेरातील तीन आणि पहूरमधील एक तरुण जागीच ठार झाले. तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय, तिघे रा. जामनेर आणि रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) यांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय २२ ते २४ दरम्यान आहे. अपघातग्रस्त वाहनात जनावरांची हाडे आढळून आली असून ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती. तसेच जखमी चालकाचे नावही समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे, तसेच गोपाळ माळी, जीवन चव्हाण, ईश्वर कोकणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचदरम्यान पथारीवरून जात असलेल्या पहूरचे सरपंच अब्बू तडवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांनी थांबून जखमी चालकाला जामनेर रुग्णालयात हलविण्यास मदत केली. चारही मृतदेह जामनेर रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात शोककळा पसरली आहे.


