भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामनेर रोडवरील एटीएम सेंटर येथे प्रौढ व्यक्तीची मदत करण्याचा बहाणा करून त्यांचे एटीएम अदलाबदल करून नंतर त्यांच्या खात्यातून ५६ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतशरण गुप्ता (वय ६२) हे सेवानिवृत्त रेल्वे अभियंता असून ते भुसावळातील अनिल नगर येथे राहतात. दरम्यान, १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते जामनेर रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या एटीएम सेंटरवर गेले होते. तेथे एक अज्ञात व्यक्ती आला अन् त्या व्यक्तीने संतशरण गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. तसेच, त्यांना मदत करण्याचा बहाणा करून संतशरण यांच्याकडील एटीएम कार्डाची अदलाबदली केली. नंतर या एटीएम कार्डचा वापर करून ७ वेळा ५६ हजार ७११ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. ही माहिती कळताच संतशरण यांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार १९ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पो.नि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल महेश चौधरी करत आहेत.



