भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील चोरवड येथील उपअभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे (४६) यास तब्बल २० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार आहेत. एका खासगी कंपनीचा नवीन सर्व्हिस कनेक्शनची क्षमतावाढ करण्यासाठीचा प्रस्ताव वरील उपअभियंत्याकडे दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारी अभियंता भुसावळ यांच्याकडे पाठविण्यासाठी इंगळे याने तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दिली. यानंतर बुधवारी २० हजार रुपयांची लाच घेताना इंगळे यास चोरवड येथे अटक करण्यात आली. याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.



