मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीला मोठे यश आल्यानंतर महायुतीने सरकार स्थापन केले आहे. नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. नितेश राणे यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषण करताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
या वेळी नितेश राणे म्हणाले की, केरळमध्ये फक्त अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करतात. त्यांच्या भाषणापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना मंत्री नितेश राणे भडकाऊ भाषण करणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र, आता राणे यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात काँग्रेसने राणे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी म्हटले की, ‘आपण त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो. पण मला पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे की, आपल्याच एका राज्याला पाकिस्तान म्हटल्यावर कोणी मंत्रिमंडळात कसे राहू शकते? एकतेची प्रतिज्ञा… देशभक्तीपर भाषणे देणाऱ्या या दोघांकडून मी अशी अपेक्षा करतो की, असे लोक मंत्रिमंडळात नसतील.’



