मुंबई : वृत्तसंस्था
यंदा राज्यात पावसाची चांगली सुरूवात झाली आहे. सगळीकडे वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. कोकण, सिंधुदुर्ग, रायगड, मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना आणि विदर्भ बुलढाणा जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला असून आजही अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच येत्या 48 तासांत अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून येत्या 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचा जोर संपूर्ण राज्यात वाढणार आहे. आज मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिय, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.



